Marathi Charolya

Me Maza
मी माझा या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. पंचवीस वर्षे पूर्ण झाली यात काही विशेष नाही, काही घडलं तरी काळानुसार दिवस महिने वर्ष पार पडतच असतात. पण मी माझाच्या बाबतीत सांगायचं तर चार ओळींची कविता घेऊन आलेला हा संग्रहं रसीकांनी उचलून धरला, विस्मरणात जाऊ दिला नाही.

आजमितीस लाखो प्रती खपल्या अनेक भाषात त्याचं रुपांतर झालं पंचवीस वर्षात सांगितलं तर खोटं वाटेल पण मी माझ्याच्या कवितांनी प्रेरीत होऊन अनेकांनी लेखणी हातात घेतली आणि अंदाजे तीस हजाराच्या घरात चार ओळींचे संग्रहं प्रकाशीत झाले.

मी माझाला प्रस्तावना नाही पण काही मान्यवर कवीनी अशा प्रेरीत होऊन लिहिलेल्या ( सामान्य दर्जाच्या) संग्रहाना अव्वल दर्जा देणार्या प्रस्तावना देऊन चांगली कमाई करून घेतली मी माझाचं कव्हर,मी माझाचा आकार ,मी माझाचं नाव सगळ्याचं अनुकरण जमलं पण तरी मी माझाला धक्का लागला नाही, नाहीतर आईची एकसष्टी होती म्हणून तिच्या चार ओळींचं पुस्तक तिला गिफ्ट केलं , लग्नाला पंचवीस वर्ष झाली म्हणून आम्हा दोघांच्या कवितांचं पुस्तक प्रकाशीत केलं, मी मुलाला म्हंटलं चांगले मार्क मिळवून दाखव एक नाही दोन पुस्तकं काढू असे संवाद लोक आवर्जून मला ऐकवायला लागले आणि त्या राजकन्येच्या कथेत कसं तिला सात गाद्यांच्या खाली ठेवलेली टाचणी टोचत राहिली.

तसा मी माझाचा जन्म कसा झाला हा प्रश्न मलाच टोचत राहिला, सहा प्रकाशकानी हे पुस्तक नाकरलं ती या पुस्तकाची सुरुवात धरायची का ?
की ओळखीतल्या एक दोघानी नक्की पुस्तक छापू म्हणत वेळ काढत मला वाटेला लावलं होतं ती सुरुवात धरू ?
नाही नाही मी माझाची सुरुवात वेगळीच आहे... जरा ती माझ्या दृष्टीच्या टप्प्यात येऊ दे.. मी ती इथे मांडायला सुरुवात करतो.. अनेक टप्पे, अनेक अनेक रंग या सुरुवातीच्या प्रवादात आहेत...

युगं घडून जायला युगं जावी लागतात
पण आठवायला मात्र
काही क्षण पुरतात...

असं मीच म्हणालो.. पण ते नेमके क्षण पकडण्याचा प्रयत्न मी इथे तुमच्या सोबत करणार आहे कारण या प्रवासाचे तुम्हीच तर साथीदार, साक्षीदार, आणि एका अर्थी भागीदार सुद्धा आहात....