Marathi Poems

Marathi Poetry मी माझाचे किस्से सांगतो
कवीने कसं असावं ? हा प्रश्न मधे एक दोघांनी मला मुलाखतीत विचारला होता. चांगला प्रश्न आहे असं मला तेंव्हाही वाटलं होतं कवीने जगावेगळं असू नये हे सामाईक उत्तर झालं पण आता इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मला असं वाटतय. बाकी काही असो कवीने स्वत:शी ठाम असायला हवं चुकीची असली तरी त्याची स्वत:ची मतं असावीत आणि त्या बाबतीत तो प्रामाणिक हवा.

मी माझाला उद्या सव्वीस वर्ष होतायत. सव्वीस वर्षांपुर्वी एव्हाना मी प्रकाशना आधीची पूर्वसंध्या अनुभवत होतो... म्हणजे एकाअर्थी गुदमरत होतो. प्रकाशन बाबांच्या हस्ते करायचं होतं, विजय तेंडुलकरांसारखी आसामी प्रकाशनला मिळाली होती पण समारंभाचं ठिकाण ठरत नव्हतं. अनिरुद्धच्या गच्चीत समारंभ करू असं सगळ्यांचं मत होतं आणि दादाना ते इतकं मान्य नव्हतं, वेणुगोपाळांकडे( सेक्रेटरी) मी परवानगी घ्यायला गेलो ते म्हणाले मि. गोखलेसे सिग्नेचर लेके अर्जा लेके आव मैं साईन कर देगा... ते इतकं सोप्पं नव्हतं.

मी म्हणालो ना कवीला ठाम व्हावं लागतं... मी स्पष्ट म्हणालो दादा सही नाही देणार, या घडीला त्यंच्यासमोर पुन्हा अर्जा साठी उभं राहयला मलाही नाही जमणार . तुम्ही तशीच परमिशन दिलीत तर बरं होईल क्षणभर वेणुगोपाळ मला न्याहळत राहिले, त्यांच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालो होतो मी. ते हसले. म्हणाले जाओ पांडू को टेरेस साफ करने को बोलो. मग घाईने म्हणाले रेहेनेदो मैंच बोलता हूं गच्चीतच समारंभ पार पडला तेंव्हा मी किंगसर्कलच्या ब्राह्मण वाडीत पेईंगगेस्ट होतो. त्यामुळे तिथले आणि इथले असे मिळून न बोलावता शंभरच्या वर रसीक कार्यक्रमाला हजर होते शरयू सुद्धा खास कोल्हापूरहून प्रकाशनासाठी आली होती.

तुकाराम जाधव पालखी घेऊन आले होते चार पावलं मी माझाच्या प्रती पालखीत घालून बाबांजवळ आणल्या गेल्या. समारंभ साधेपणाने पण छान झाला... माईला चार शब्द बोलण्याची विनंती केली गेली. पण तेंव्हा तिला एक शब्दही बोलणं शक्य नव्हतं हाती घेतलेलं मिशन पूर्ण झाल्यावर एक थकवा येतो तसं तिचं झालं होतं एका अपयशी नाकारा मुलाच्या आयुष्यात एक चमत्कार घडू जात होता मी माझा लोकप्रियं होत होतं आणि नवशे गवशे हितंचिंतक माझ्या भोवती जमायला लागले होते. तेंव्हाच एकाने प्रस्ताव आणला मी माझा असं जोरात खपतय तर तुला त्याचा फायदा मिळवून देतो , कसा? तर मी माझा वर हसमुख चायची जाहिरात छापायची...काव्यसंग्रहा मागे जाहिरात... मला ऐकूनच कसंतरी झालं... मी नाही म्हंटल्यावर त्याने हा प्रस्ताव दादांसमोर ठेवला. खरं तर दादानी म्हणायला हवं होतं यात काही बोलायचा मला अधिकार नाही तुम्ही त्याच्याशी नाहीतर त्याच्या बहिणीशी बोला. पण तसं झालं नाही. कविता करून पोट भरत नाही इथपासून ते हे पुस्तक वर्ष सहा महिने खपेल मग त्याचा हा भर राहणार नाही असं ते म्हणाले.

माझा दादांवर या बाबतीत इतका राग नाही हं! माझं कसं होणार या काळजीपोटीच ते बोलत होते फक्त माझं कसं होणार या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता... जो माईने घेतला. नंतर आम्ही एकमेकाचं तोंडही पाहणार नाही असं कोणी भविष्य वर्तवलं असतं तर मी त्याला तेंव्हा वेड्यात काढलं असतं पण इथेही काही बाबतीत मी ठाम राहिलो त्याचा हा परिणाम रसीक म्हणून तुम्हीही सांगा मी माझा च्या मलपृष्टावर हसमुख चाहची जाहिरात बघून कसं वाटलं असतं मधे मी म्हणालो होतो ना

“तुझी हिशोबाची वही
का ठेवलीस माझ्या कवितेच्या वहीवर
दोघीना एकत्र बघून मला
दाटून येतो गहिवर...”

तसंच काहीस. कारण नंतर मी माझा वाचून प्रेरीत झालेले अनेक चार ओळींच्या कवितांचे संग्रहं आले आणि काही संग्रहावर रूपसंगम, बेडेकर मसाले यांच्या जाहिराती झळकल्या.. तरी मी माझ्या मताशी ठाम होतो, अजूनही आहे आधी मी घरात राहत नव्हतोच पण लग्न झाल्यावर तर त्यांची आणि माझी दोघांची कुचंबणा व्हायला लागली त्यांच्याच घरात त्यांच्या मनाविरुद्ध राहणं जमेना मग घर सोडायच्या निर्णयावर मी ठाम झालो, उमाची साथ होतीच आणि त्यांची ही तिच इच्छा असावी.. गृहछिद्र मांडतोय असं नाही.. पण ठामपणा सांगतो

तेंव्हा काही परिचितानी मला अनाहुत सल्ला दिला रेशनकार्डवर तुमचं नाव आहे ना, तुम्हाला भ्यायची गरज नाही ते तुम्हाला तसं बाहेर काढू शकत नाहीत. तसेही दादा काही मला तसेच बाहेर काढत नव्हते. हे त्यानी मला नंतर सांगितलं पण त्या आधीच मी एका गोष्टीला घाबरलो. खरच रेशनकार्ड हाताशी धरून मला त्यांचा अडवणूक करायचा मोहं झाला तर? त्यांचच घर असून मी अरेरावी दाखवली तर? तशी शक्यताच उदभवायला नको म्हणून ठामपणे मी आम्हा दोघांच रेशनकार्ड मधलं नाव कट करून घेतलं... आणि आम्ही दोघे सर्वार्थाने मोकळे झालो विखुरलेले मणी पुरचुंडीत बांधून घ्यायचा आटापिटा चालल्या सारखा वाटतोय पण अठरा एप्रिल पूर्वसंध्या माझी कायम अशीच जाणार.. मी असे पर्यंत आणि ऐकायला समोर तुम्ही असेपर्यंत..